दिल्ली हिंसाचार : जखमींवर मोफत उपचार तर मयतांच्या कुटूंबियांना 10-10 लाख रूपये देणार, CM केजरीवालांची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली हिंसाचाराबाबत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले की हिंसाचारात जखमी झालेल्यांचा मोफत उपचार केला जाईल. गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री म्हणाले की दिल्ली सरकार मृतांच्या कुटुंबियांना १०-१० लाख रुपये देईल. तसेच गंभीर जखमींना २ लाख रुपये देण्यात येणार असल्याचे देखील ते म्हणाले.

केजरीवाल म्हणाले की, अपंगांना ५ लाख, ज्यांचे घर जळाले आहे अशांना ५ लाख आणि अल्पवयीन मृताच्या कुटुंबाला ५ लाख रुपये भरपाई देण्यात येईल. तसेच हिंसाचारात रिक्षाचे नुकसान झालेल्यांना २५ हजार आणि अनाथ झालेल्या मुलांना ३ लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच ते म्हणाले की दिल्लीच्या परिस्थितीवर कोणीही राजकारण करू नये. ते म्हणाले की दोषींना कठोर शिक्षा कण्यात येईल त्यांना सोडले जाणार नाही, मग ते माझ्या पक्षाचे असोत किंवा मग इतर पक्षाचे असोत.

दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत ३४ लोकांचा मृत्यू
एका वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात मृतांचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींनी बुधवारी लोकांना शांतता व बंधुता राखण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी देखील बुधवारी हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा केला. बुधवारी दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत १०६ लोकांना अटक करण्यात आली असून १८ एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत.

दिल्ली हिंसाचार प्रकरणी उच्च न्यायालयात १३ एप्रिल रोजी होणार पुढील सुनावणी
दिल्ली हिंसाचार प्रकरणात गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. हायकोर्टाने दिल्ली पोलिस आणि केंद्र सरकारला चिथावणीखोर विधानावर दाखल झालेल्या याचिकेवर सविस्तर उत्तर दाखल करण्यास सांगितले. ४ आठवड्यांत गृह मंत्रालयाला उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ही १३ एप्रिल रोजी होणार आहे.