बळीराजाला दुष्काळातून मुक्त कर ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे  

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कर, बळीराजाला दुष्काळातून मुक्त कर, त्याला निसर्गाची साथ लाभू दे. जनतेच्या आकांक्षा व ईच्छा पूर्ण करण्याची ताकद राज्य सरकारला मिळावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाकडे साकडे घातले.

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते १२ जुलै रोजी पहाटे २.३० वाजता  झाली.  त्यानंतर सत्कार समारंभात ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांसोबत मानाचा वारकरी म्हणून विठ्ठलाची पूजा करण्याचा मान यंदा विठ्ठल मारुती चव्हाण (वय ६१) व त्यांच्या पत्नी प्रयाग विठ्ठल चव्हाण (वय ५५) रा. सांगवी सुनेगाव तांडा, ता. अहमदपूर, जि. लातूर यांना मिळाला. शासकीय महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मानाच्या वारकऱ्यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा, शाल, साडी आणि महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा वर्षभरातचा मोफत पास व १५ हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, कृषीमंत्री अनिल बोंडे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर,  जलसंपदा, सामाजिक न्याय मंत्री सुरेख खाडे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे, दिलीप कांबळे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर,  माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, नगराध्यक्षा साधना भोसले, शकुंतला नडगिरे, नरेंद्र पाटील, विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, डीवायएसपी डॉ. सागर कवडे, गायिका अनुराधा पौडवाल, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार आदी उपस्थित होते. याप्रसंगी निर्मल वारी अंतर्गत स्वच्छ दिंडी म्हणून तीन दिंडीप्रमुखांचा सन्मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

Loading...
You might also like