Lockdown : पंतप्रधान मोदींचे दिवे लावण्याचे आवाहन अयोग्य आहे : CM भपेश बघेल

रायपूर : वृत्तसंस्था –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हणजेच 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटासाठी दीप प्रज्वलित करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पंतप्रधानांचे दिवे लावण्याचे आवाहन हे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना बघेल म्हणाले, भारतातील प्रत्येक घरात भगवान राम वनवासातून आल्यानंतर आणि लंका जिंकल्यानंतर घरी परतले त्यावेळी दिवे पेटवण्यात आले.

दिवाळीत दिवे पेटवले जातात. साधारणत: आनंदाच्या वेळी दिवा लावला जातो, सध्या करोनामुळे असे कोणतेही वातावरण नाही, असे बघेल यांनी म्हटले आहे. कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागता आहे. अशा परिस्थितीत, दिवा लावणे योग्य नाही. लॉकडाऊनमध्ये दारूचे दुकान उघडण्याबद्दल बघेल म्हणाले की, प्रत्येक परिस्थिती पहावी लागते. लोकांचे जीवन देखील महत्त्वाचे आहे. ज्यांना मद्यपान करण्याची सवय आहे त्यांनी दुसरी नशा करून मरावे, हे देखील बरोबर नाही. दारुची दुकाने बंद असताना मी अधिकाऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याची सूचना केली.

तीन लोकांनी स्पिरीट पिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही गंभीर स्थिती आहे. त्यास सामोरे जाणे महत्त्वाचे असल्याचे बघेल यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सर्व राज्यांना अधिक चांगल्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे. लॉकडाऊनबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करताना त्यांनी कोणतीही ठोस रणनिती न राबवता लॉकडाऊन केल्याचे म्हटले आहे. बरेच लोक चिंताग्रस्त झाले आहेत. एकिकडे परदेशातून येणाऱ्यांना खास विमानांची सोय केली जाते तर दुसरीकडे आपल्या गरीब लोकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नाही आणि तशी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.