मंत्र्यांच्या बंगल्यांनी थकवले BMC चे 24.56 लाख, मुख्यमंत्र्यांचा वर्षा देखील ‘डिफॉल्टर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांकडून पाणीपट्टी थकली तर महापालिका थेट आपले नळजोड कापून टाकते. मात्र मंत्री आणि त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाबत वेगळा नियम आहे का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण थकीत पाणीपट्टीबाबत माहिती अधिकारातून महत्वाची माहिती समोर आली आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यासकट आणखी इतर अनेक मंत्र्याच्या बंगल्याची नावे बृहनमुंबई महापालिकेने थकबाकीदार म्हणून घोषित केली आहेत. महापालिकेकडून घोषित केलेल्या यादीत सरकारी बंगल्याकडून तब्बल 24 लाखांपेक्षा अधिकची पाणीपट्टी थकीत असल्याचे घोषित केले आहे. मंत्र्याच्या शासकीय बंगल्याकडून 24 लाख 56 हजार 469 रुपयांची एकूण थकबाकी शिल्लक आहे. यात मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला तर आहेच. सोबतच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मींचा तोरणा, अजित पवार यांचा देवगिरी, जयंत पाटलांचा सेवासदन, नितीन राऊत यांचा पर्णकुटी, बाळासाहेब थोरात यांचा रॉयल स्टोन बंगला, फडणवीस यांचा सागर, अशोक चव्हाण यांचा मेघदूत, दिलीप वळसे- पाटील यांचा शिवगिरी, सुभाष देसाई यांचा बंगला. एकनाथ शिंदे यांचा नंदनवन, राजेश टोपे यांचा गेट वन, नाना पाटोळे यांचा चित्रकूट, राजेंद्र शिंगणे यांचा सातपुडा, नवाब मलिक यांचा मुक्तागिरी, छगन भुजबळ यांचा रामटेक, रामराजे निंबाळकर यांचा अजंठा तसेच सह्याद्री या शासकीय अतिथी गृहाचाही समावेश आहे.