Imtiaz Jalil : ‘CM टीव्हीवर येऊन ज्ञान पाजळणार असतील तर कोणीही 1 जूननंतर ऐकणार नाही’

पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसात राज्यातील रुग्संख्या आटोक्यात येत असली तरी कोरोनाविरुद्धच्या लढाईत अद्याप पूर्ण यश आले नाही. त्यातच कोरोनाच्या तिस-या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णतः टळला नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशारा म्हणजे राज्यात 1 जूननंतरही कडक निर्बंध राहतील याचे संकेत मानले जात आहेत. यावरून आता औरंगाबादमध्ये शिवसेना आणि एमआयएम पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. लॉकडाऊन उठला नाही, तर 1 जूनपासून औरंगाबादमध्ये लॉकडाऊनच्या निर्बंधांचे पालन केले जाणार नाही. दुकान उघडली जातील, असा थेट इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. दरम्यान, जलील यांनी दिलेल्या आव्हानाला शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये दुकान उघडण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना त्यांना उत्तर देईल, असा इशाराच खैरे यांनी दिला आहे.

लॉकडाऊन शिथील करण्याची गरज आता आहे. कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन मागे घ्यावे लागेल. नाहीतर लोकं स्वत: लॉकडाऊन आता पाळणार नाहीत. औरंगाबादची जनता तर नक्कीच 1 जूनपासून लॉकडाऊनचे पालन करणार नाही. 2 महिन्यांपूर्वी शहराचा कोरोनाचा आकडा 1800 वर गेला होता. , पण आज आपण 120 वर आलो आहोत. ग्रामीण भागात 200 च्या आसपास आलो आहोत. लोकांनी इतक सहकार्य दिले. इतक कष्ट सहन करून आकडेवारी कमी केली. आता पुन्हा पंतप्रधान, मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन आमच्यासमोर ज्ञान पाजळणार असतील तर कोणीही कोणाचं ऐकणार नाही. मग पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मी सांगितल तरी लोक ऐकणार नाहीत, असे खासदार इम्तियाज जलील म्हणाले. लॉकडाऊनला पण एक मर्यादा असते. आजवर लोकांनी खूप सहन केले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात आणि दोनवेळच जेवण मिळवण्याचे वांदे झाले आहेत. पंतप्रधानाचे तर आम्ही 200 टक्के ऐकणार नाही. आम्हीच काय आता तर त्यांचे भक्त देखील ऐकणार नाहीत. कारण जेव्हा देशात कोट्यवधी लोक रडत होते. तेव्हा पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये दीदी ओ दीदी करत होते, असा टोला देखील जलील यांनी लगावला आहे.