त्यांच्या ‘खोपडी’त घोळ, मुख्यमंत्री फडणवीसांचा आघाडीच्या नेत्यांवर ‘घणाघात’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मार्क कमी पडले म्हणून माझा पेन खराब होता, असे म्हणून चालत नाही. तसे तुम्हाला लोक मते देत नाहीत, म्हणून मशीनमध्ये घोळ आहे, असे म्हणून चालेल का ? घोळ ‘ईव्हीएम’ मशीनमध्ये नव्हे, तर तुमच्या ‘खोपडी’त (डोक्यात) घोळ आहे, असा सणसणीत आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांवर केला.

मुख्यमंत्री फडणवीस महाजनादेश यात्रा निमित्त संगमनेर येथे आज दुपारी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य श्याम जाजू आदी मान्यवर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, देशातील व राज्यातील जनतेच्या मनात आज किती आहे. केंद्रात मोदी सरकार व राज्यात महायुतीचे सरकार हे जनतेसाठी काम करणारे सरकार आहे, याची सर्वांची खात्री झालेली आहे. त्यामुळे मतदानाला गेल्यानंतर सर्वजण आपोआप युतीलाच मतदान करतात. परंतु पराभवामुळे ग्रस्त झालेल्या आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम मशीन वर आक्षेप घेतला जात आहेत.

गेल्या पाच वर्षात राज्य सरकारने जनतेच्या हितासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसारखा महत्त्वाचा विषय हाती घेतला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत कर्जमाफीची योजना चालूच राहील, असेही फडणवीस म्हणाले.