युतीचा प्रचार ठरला ; ‘या’ शहरात फोडणार प्रचाराचा नारळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या जागा वाटपाचा घोळ अद्याप पूर्ण होत नसतानाच युतीने प्रचारचा कार्यक्रमही ठरविला असून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूरात प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. त्याअगोदर १५ ते १८ मार्च दरम्यान दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे विभागीय मेळावे सहा जिल्ह्यांमध्ये होणार आहेत.
युतीची रणनिती ठरवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मंगळवारी उशिरा मध्यरात्री पर्यंत मातोश्रीत चर्चा रंगली.

युतीची घोषणा केल्यावर मुख्यमंत्री दुसऱ्यांदा मातोश्रीवर आले ते लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे २३ आणि भाजपचे २५ उमेदवार हे आता युतीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे यापुढे युतीच्या उमेदवारांचा प्रचार एकदिलाने करण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी, प्रचाराच्या सुरवातीलाच युतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकत्र मेळावे आयोजित केले आहेत. येत्या १५, १७ आणि १८ मार्च रोजी हे मेळावे महाराष्ट्रात सहा वेगवेगळ्या जिल्ह्यांत होणार आहे. तसेच पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा युतीचा महामेळावा कोल्हापूर येथे आयोजित केला जाणार आहे.

या बैठकीला शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर उपस्थित होते. तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.

या बैठकीत ठरलेल्या युतीच्या रणनितीप्रमाणे भाजपा व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पहिला मेळावा येत्या शुक्रवारी १५ मार्च रोजी दुपारी अमरावतीला होणार असून युतीचा दुसरा पदाधिकारी मेळावा १५ रोजी रात्री नागपूरला होणार आहे. युतीचा तिसरा मेळावा येत्या रविवार १७ मार्च रोजी दुपारी औरंगाबादला होणार असून याच दिवशी युतीचा चौथा मेळावा १७ मार्च रोजी रात्री नाशिकला होणार आहे. युतीचा पाचवा मेळावा सोमवार १८ मार्च रोजी दुपारी नवी मुंबईत होणार असून याच दिवशी युतीचा सहावा मेळावा १८ मार्च रोजी रात्री पुण्यात होणार असल्याचे या बैठकीत ठरले.