काँग्रेसने नागपुरात भंडाऱ्यावरून पार्सल आणलं ; ‘या’ नेत्याला मुख्यमंत्र्यांचा टोला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपुरात भाजपकडून नितीन गडकरी तर काँग्रेसकडून नाना पटोले आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात हजर होते. या प्रचार सभेदरम्यान बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यावर हल्लबोल चढवला. ‘काँग्रेसने नागपुरात भंडाऱ्यावरून पार्सल आणलं आहे’. अशा शब्दात पटोलेंना मुख्यमंत्र्यानी टोला लगावला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘ काँग्रेसने नागपुरात भंडाऱ्यावरून पार्सल आणलं आहे. भंडाऱ्यात जाऊन विचारा त्यांनी तिथे एक तरी प्रकल्प किंवा कारखाना आणला का ? फक्त राजीनामे देणं आणि पक्ष बदलणं, एवढेच राजकारण नाना पटोले यांनी केलं असून मी का त्यांच्यासाठी माझ्या तोंडाची वाफ वाया घालवू ? असे म्हणत मुख्यमंत्र्यानी पाटोलेंना पुन्हा टोला लगावला.

माझ्या विकासामागे तुमच्याच अपयशाचं श्रेय

यावेळी बोलताना गेले काही दिवस नागपूरच्या मिहान प्रकल्प आणि मेट्रो रेल संदर्भात काँग्रेस नेते विलास मुत्तेवर यांच्या दाव्यांवर नितीन गडकरी भडकले. विलास मुत्तेवार यांचं नाव न घेता , तुमच्या कर्तृत्वामुळेच नागपुरात आजवर विकास कामं झाली नव्हती. त्यामुळेच जनतेने मला निवडून दिलं आणि मी कामं करू शकलो, असे नितीन गडकरी म्हणाले. माझ्या विकासकामांमागे तुमच्या अपयशाचं श्रेय असल्याचं म्हणत गडकरींनी कोपरखळी मारली.

दरम्यान, नागपुरातील प्रचारसभांमध्ये आतापर्यंत विकास कामांवर बोलणं होत होतं. मात्र, आता प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात भाजपने काँग्रेसला आणि काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी काँग्रेस नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

You might also like