‘कोल्हापूर, सांगलीच्या महापुराला मुख्यमंत्रीच जबाबदार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही ठिकाणी आलेल्या महापुराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत असा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सारंग यादवडकर यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांवर या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सारंग यादवडकर म्हणाले की, ‘कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही ठिकाणी नदी पात्रालगत भागात असलेल्या पूररेषेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार डीपीनुसार बदल करण्यात आले. निळ्या आणि लाल पूररेषेत डीपीमध्ये बदल करण्यात आला. त्यामुळेच सांगली आणि कोल्हापुरात महापूर आला. पूररेषा नदीच्या आतील भागात घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.

यासाठी स्थानिक प्रशासन, क्रेडाई या बिल्डर संस्थेतले काहीजण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केल्याने जवळपास 1300 एकर जागेवर बांधकाम करण्यात आलं. यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पूर आला. ज्यामुळे लाखो नागरिकांची घरं पाण्याखाली गेली. या सगळ्या घटनेला स्थानिक प्रशासन, पाटबंधारे विभाग आणि मुख्यमंत्री जबाबदार आहेत.’

कोल्हापूर, सांगलीकरांची पुरामुळे मोठी हानी झाली आहे. लाखो लोकांचे संसार पाण्याखाली गेले. हजारो लोक बेघर झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात महापुराने हाहाकार उडवला. पुरामुळे सर्वसामान्य माणूस, शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकही उद्ध्वस्त झाला आहे. महापुरामुळे वीज, पाणीपुरवठा, संपर्क यंत्रणांसह रस्त्यांचीही मोठी हानी झाली. आतापर्यंत 60 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –