पवारांनी पाठवलेलं बारामतीचं ‘ते’ पार्सल परत बारामतीला पाठवा : देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. कॅप्टनने माघार घेतली मग त्यांनी उतरवलेली पोरं काय खेळणार. मावळ मतदारसंघात पवार कुटुंबीयांनी बारामतीवरुन पाठवलेले पार्सल पुन्हा बारामतीला पाठवा. अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पनवेल येथील जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान काल पूर्ण झाले. येत्या २९ एप्रिलला चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील १७ मतदार संघांचा समावेश आहे. दरम्यान, मावळ लोकसभा मतदार संघाचे युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आघाडी सरकारने २००८ ला जो दहशतवादी हल्ला झाला होता त्या हल्याचा केवळ निषेध केला. त्यापलीकडे त्यांनी काही केले नाही. आणि उरी येथे झालेल्या हल्ल्याचा बदला भाजप सरकारने घेतला. आपल्या सैन्याने अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याचे जगाने मान्य केले आहे. परंतु काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाखिचडीला हे मान्य नाही. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.

याचबरोबर, काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या जाहीरनाम्यात म्हणत आहे आम्ही १२४ कलम काढून टाकू. देशविरोधी कारवाई करणाऱ्यांच्या विरोधात ठोस भूमिका घेणारे कलम काढून टाकण्यात यावे ही विरोधी पक्षाची मागणी आहे. अशा पक्षाला मतदान करणे योग्य आहे का? असा सवालही त्यांनी केला.

इतकेच नव्हे तर, त्यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. देशातील विरोधकांची अवस्था आज वाईट झाली आहे. पहिले निवडणूक लढवणार असे सांगतात आणि नंतर माघार घेतात. असा टोलाही त्यांनी शरद पवार यांना लगावला. तसेच जर कॅप्टननेच माघार घेतली मग त्यांनी उतरवलेली पोरं काय खेळणार असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, मावळ मतदारसंघात पवार कुटुंबीयांनी बारामतीवरुन पाठवलेले पार्सल पुन्हा बारामतीला पाठवा. असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विशेष म्हणजे, मावळ लोकसभा मतदार संघातून युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात शरद पवार यांचे नातू पार्थ पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. दरम्यान मावळ मतदार संघातून पार्थ पवार यांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीकडून जोरात तयारी सुरु आहे.