लोकसभा 2019 : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार यांची आज नगरला सभा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर लोकसभा मतदारसंघाची जागा दोन्ही प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे भाजपच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीच्यावतीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांची आज नगरला सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. दोन्ही नेते नेमके काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तीन-चार दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नगरला आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हेही आले होते. ही सभा जास्त करिष्मा करू शकली नाही. परिणामी मुख्यमंत्री फडवणीस पुन्हा नगर तालुक्यातील वाळकी येथे जाहीर सभा घेत आहेत. काँग्रेसच्या स्टार सरकारच्या यादीत असलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसऐवजी नगरमध्ये खुलेआमपणे भाजपचा प्रचार सुरू केला आहे. भाजपात जाहीरपणे प्रवेश केलेला नसला, तरी त्यांनी थेट भाजप प्रचार सुरूच ठेवला आहे. दुसरीकडे काँग्रेसने त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता केवळ बघ्याची भूमिका घेतलेली आहे.

अनेक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नगर लोकसभेची जागा भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळेच भाजपच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः नगरला स्वतंत्र सभा घेत आहेत. त्यापूर्वी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व इतर नेत्यांच्या सभा झाल्या होत्या. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शरद पवार यांनी नगरला अनेक सभा घेतल्या आहेत. यापूर्वी नगर शहर दौरा करून मतदारसंघातील विविध ठिकाणी जाहीर सभा घेतल्या होत्या. आज पुन्हा ते नगरला सभा घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते नगरच्या जागेवर विशेष लक्ष ठेवून असून त्यांच्याकडून सतत आढावा घेतला जात आहे. सुजय विखे यांना पराभूत करण्यासाठी पवार यांनी राजकीय व्यूहरचना सुरू केली आहे. दुसरीकडे विखेंची विजयासाठी धडपडत सुरू आहे. आज नगरला दोन प्रमुख नेत्यांच्या सभा नेमका काय करिष्मा करून दाखवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.