Post_Banner_Top

दुष्काळाच्या तक्रारी ‘या’ व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर नोंदवा ; ४८ तासांत निवारण : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात भीषण दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. सर्वाधिक दुष्काळाच्या झळा मराठवाड्याला सोसाव्या लागत आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक आयोजित केली होती. फडणवीस यांनी जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, उपाययोजना यांचा कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून आढावा घेतला. यावेळी दुष्काळाशी संबंधित तक्रारी थेट व्हॉट्सअ‍ॅपवर नोंदविण्यात याव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच या तक्रारींचे ४८ तासांच्या आत निवारण करण्यात यावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.

औरंगाबाद आणि जालन्यासाठी व्हॉटस्ॲप क्रमांक जारी –

राज्यात दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी मिळून काम करू आणि दुष्काळावर मात करू, असं सांगतानाच फडणवीस यांनी औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यासाठी ८८७९७३४०४५ हा व्हॉटस्ॲप क्रमांक जाहीर केला. या क्रमांकावर दुष्काळाशी संबंधित तक्रारी, मागण्या थेट माझ्यापर्यंत पोहोचतील. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार त्यावर तत्काळ कार्यवाही करावी तसेच त्याचा अहवाल आपल्याला पाठवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. ज्या ठिकाणी अतिरिक्त चारा छावण्यांची, टँकरची गरज आहे तिथली मागणी व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून नोंदवली जावी. राज्यात टँकरने पाणी पुरवठा करताना त्यावर जीपीएस सिस्टिम बसवण्यात आली आहे, त्यामुळे कोणत्या टँकरच्या कुठे आणि किती फेऱ्या झाल्या हे लक्षात येऊ शकेल असेही फडणवीस म्हणाले.

यावेळी साधलेल्या संवादात मुख्य सचिव यू. पी. एस. मदान यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, यांच्यासह जवळपास ५०० जण सहभागी झाले होते.

Loading...
You might also like