राज्यात लवकरच मेगा भरती सुरू करणार : फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात लवकरच मेगा भरती सुरू केली जाणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मेगाभरतीत मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असेही त्यांनी विधानसभेत सांगितले. मराठा आरक्षणासाठी भरती थांबवण्यात आली होती. मात्र, आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असून ७२ हजार पदांची सरकारी मेगाभरती तत्‍काळ सुरू करण्यात येईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे.

विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, मेगा भरतीच्या घोषणेमुळे मराठा समाजातील तरुणांचा सरकारी नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे. पावसाळी अधिवेशनात राज्यात ७२ हजार पदांची सरकारी नोकर भरती केली जाणार असून पहिल्या टप्प्यात ३६ हजार पद भरली जाणार आहेत.

या दरम्यान राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने सुरू होती. सकल मराठा मोर्चा आणि मराठा समाजाच्या विविध संघटनांनी आरक्षण जाहीर होत नाही, तो पर्यंत भरती करू नये, अशी मागणी केली होती. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षण विधेयक पारित झाल्याने लवकरच मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.