CM फडणवीस राबवितात शरद पवारांचे ‘धोरण’, करतात ‘त्यांचे’ ‘समाधान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शरद पवार हे राज्यातील राजकारणात सक्रीय असताना विविध जिल्ह्यात कार्यक्रमाला जात. त्यावेळी एखाद्या इच्छुकाच्या खांद्यावर हात ठेवून कामाला लागा असे सांगत. आपल्यालाच तिकीट मिळणार, असा साहेबांनी संदेश दिला असे समजून नेते आता आमदार झालोच अशा थाटात तालुक्यात जात आणि प्रचाराला सुरुवात करीत. जेव्हा तिकीटांचे वाटप होत असे, तेव्हा साहेबाने आपल्याप्रमाणे अनेकांना कामाला लागण्याचा संदेश दिला असल्याचे त्यांना समजत. त्यामुळे आता प्रचार सुरु केलाच आहे तर निवडणुक लढवूच अशा तयारीने राज्यात काँग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होत असे.

सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचाच कित्ता गिरवित असल्याची चर्चा सुरु झाली आहे. एका बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर भाजपामध्ये आवक झाली आहे. दुसरीकडे इतकी वर्षे पक्ष वाढविण्यासाठी काम केले. आता तरी अनुकुल वातावरणात आपल्याला संधी मिळेल, अशी असंख्य भाजपा नेते, कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे हे सर्व इच्छुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मिळेल तेथे भेट घेऊन आपले घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या युक्त्या केल्या. त्यातील काहींना मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिल्याने ते आपल्यालाच तिकीट मिळाल्याच्या आनंदात आहेत तर, काही जणांकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांच्या पोटात गोळा आला आहे.

अनेक इच्छुक मुख्यमंत्र्यांना मुंबईत येऊन भेटत असतात. त्यावेळी मुख्यमंत्री त्यांना तु मुंबईत काय करतो, मतदारसंघात जाऊन काम कर, तुला आमदार होताना मला पहायचंय, असे सांगताना दिसत आहे. इच्छुक उड्या मारतच तालुक्याला परत जात आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्री एकाच मतदारसंघात तीन तीन चार चार जणांना सांगत असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Visit :- policenama.com

You might also like