’त्या’ घटनेबाबत नितीश कुमार थेट करणार उध्दव ठाकरे सरकारशी चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या तपासासाठी आयपीएस अधिकारी आणि बिहार शहर पूर्वचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी मुंबईत आले आहेत. मात्र मुंबई महापालिकेने त्यांना क्वारन्टाइन केले आहे, आता हे प्रकरण पेटण्याची चिन्ह दिसत आहे. यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ते महाराष्ट्र सरकारशी याबाबत चर्चा करणार आहेत. आमच्या पोलीस अधिकार्‍याला दिलेली वागणूक चुकीची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुंबईमध्ये पाटणा पोलिसांना मिळालेल्या वागणूकीबाबत कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. याआधी तपासासाठी मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांकडून सहकार्य होत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. कारण मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांच्या टीमला कोणतेही वाहन उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यांच्या सुरक्षेसाठीही काही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बिहार पोलिसांवर रिक्षाने फिरण्याची वेळ आली.