‘मुख्यमंत्री हात धुवा सांगण्यापलिकडं काय करतात ?’, उध्दव ठाकरेंनी विरोधकांना दिलं ‘जबरदस्त’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक तथा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीस ‘अभिनंदन मुलाखत’ असे नाव देण्यात आले असून, त्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती, भाजपकडून होणारी टीका, सरकारसमोर असणारे आव्हान यासंदर्भात भाष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी या ‘अभिनंदन मुलाखती’चा प्रोमो पोस्ट करताना उद्या धमाका असे कॅप्शन दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांना राऊत यांनी काही बोचरे प्रश्न विचारल्याचे दिसत असून, उद्धव ठाकरे काही प्रश्नांवर बिचकल्याचे दिसत आहेत. एकूण ४४ सेकंदांचा हा प्रोमो आहे.

या प्रोमोमध्ये संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा सांगण्यापलीकडे काय करतात, अशी विचारणा केली आहे. त्यावर “ठीक आहे, हात धुतो आहे, जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे जाईल,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे.

पुढे ते म्हणतात, “हे असे विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका, कारण विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळते तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. कोणी कितीही आडवे आले, त्या आडवे येणाऱ्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल,” अशा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी याआधीही उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली आहे. सामना या वृत्तपत्रातून ही मुलाखत उद्या (२७ नोव्हेंबर) प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे या मुलाखतीत मुख्यमंत्री कोणकोणते गौप्यस्फोट करतात, कोणत्या विषयावर बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You might also like