कर्णबधीर आंदोलकांना लाठीमार प्रकरणी अहवाल सादर करा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन करणाऱ्या कर्णबधीर आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलक अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. लाठी हल्ला प्रकरणामुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. परंतु ऐन अधिवेशनाच्या काळातच हा प्रकार घडल्याने पुणे पोलीस आय़ुक्तांना सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर याप्रकरणात सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना लक्ष घालण्याच्या सुचना दिल्या आहेत.

पुण्यातील समाज कल्याण आयुक्तालयासमोर आपल्या शिक्षण आणि नोकरीसंदर्भातील मागण्या घेऊन आज सकाळपासून कर्णबधीर तरुणांनी ठिय्या आंदोलन सुरु केले होते. त्यांच्या मागण्या येथे पुर्ण नाही झाल्या तर मुंबई पर्यंत पायी जाऊन आंदोलन करण्याचा इशारा या तरुणांनी दिला होता. परंतु त्यांना मुंबईला जाण्यासाठी पोलिसांनी परवनागी नाकारली.

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी या तरुणांनी आंदोलन सुरु केले होते. तेव्हा अचानक दुपारी दोनच्या सुमारास पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी उडालेल्या गोंधळात अनेक तरुण खाली पडले. त्यांना मार लागला. पोलिसांच्या लाठीहल्ल्यातही त्यांना अनेकांना जबर मार लागला. त्यानंतर काही तरुणांना पोलिसांनी आपल्या गाडीत कोंबून नेले. त्यानंतर आंदोलकांनी याठिकाणी ठाण मांडले असून ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. तसेच राजकिय वर्तूळातील काही नेत्यांनी या लाठीहल्ल्यावर प्रतिक्रीया दिल्या आहेत.

मुंबईमध्ये आजच विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्याच वेळी पुण्यात कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीहल्ला झाल्याची घटना घडली. सरकार पोलिसांच्या माध्यमातून आंदोलकांचा आवाज दाबू इच्छित आहे अशी टिका सर्वच स्तरातून केली जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्‍यांनी पुणे पोलीस आयुक्तांना याप्रकरणाची सखोल चौकशी करून उद्यापर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याच्या सुचना दिल्या आहेत.