‘कंगना रणौतला द्यायची नुकसानभरपाई व वकिलांची करोडोंची फी मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या खिशातून द्यावी’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) च्या मुंबईमधील ऑफिसात 9 सप्टेंबर रोजी बीएमसीनं बेकायदेशीर बांधकाम असल्याचं सांगत तोडफोड केली होती. यावर आता मुंबई हायकोर्टानं (HIGH COURT OF BOMBAY) निर्णय दिला आहे. कोर्टानं म्हटलं आहे की, बीएमसची ही अ‍ॅक्शन सूडाच्या भावनेतून घेतली आहे. या तोडफोडीसाठी आता बीएमसीनं नुकसानभरपाई द्यायची आहे, असंही कोर्टानं सांगितलं आहे. यावरून आता भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

अतुल भातखळकर म्हणाले, मुंबई महानगरपालिकेकडून सूडबुद्धीनं करण्यात आलेल्या कारवाईचा बोलविता धनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच होते. त्यामुळं उखाड दिया म्हणणाऱ्यांनाच उच्च न्यायालयानं उखाड दिया है.

भातखळकर म्हणतात, अगोदर अर्णब गोस्वामी आणि आता कंगना रणौत प्रकरणात न्यायालयाकडून आलेल्या निर्णयामुळं ठाकरे सरकार किती सूडबुद्धीनं काम करत आहे, यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आपला अहंकार जपण्यासाठीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई घडवून आणली असून, कंगना रणौतला द्यायची नुकसानभरपाई आणि वकिलांना दिलेली करोडो रुपयांची फी उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या खिशातून द्यावी, अशी आग्रही मागणीसुद्धा त्यांनी केली आहे.

सरकारविरोधात टीका करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणं, मारहाण करणं, जेलमध्ये टाकणं, या ना त्या मार्गानं लोकांचा आवाज दडपण्याचंच काम ठाकरे सरकार करत आहे. ठाकरे सरकारकडून राज्यात छुपी आणीबाणी लागू केली गेली असल्याचा आरोपही भातखळकर यांनी केला आहे.

You might also like