Lockdown : मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्र सदनात मराठी प्रवाशांना मिळाला ‘निवारा’ !

पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला मदत केल्यामुळे आता मी महाराष्ट्रात सदनात राहायला आले आहे. मला मुंबईला कधीही जायला मिळो, मला आत्ताच घरी आल्यासारखे वाटू लागले आहे. अशी प्रतिक्रिया मूळच्या मुलुंडच्या रहिवासी असलेल्या मात्र, कोरोनाच्या विलगीकरणामुळे दिल्लीतच राहाव्या लागलेल्या एलिझाबेथ पिंगळे यांची दिली आहे.

एलिझाबेथ इस्राइलमध्ये आजारी असलेल्या वडिलांना बघायला गेल्या होत्या. तिथे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्या 22 मार्च रोजी दिल्लीत परतल्या. त्याच दिवशी त्या मुंबईला जाणार होत्या. पण, परदेशातून आलेल्या प्रवाशांचे 14 दिवसांसाठी विलगीकरण करण्यात आल्याने त्यांना दिल्लीतील हॉटेलमध्ये राहावे लागले. मात्र, हॉटेल बंद करण्यात आल्याने एलिझाबेथ यांच्यासह महाराष्ट्रातील 40 रहिवाशांपुढे निवासाची समस्या निर्माण झाली होती. एलिझाबेथ यांनी ही समस्या व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने दखल घेउन थेट एलिझाबेथ यांना फोन लावला. ताई, तुम्ही काळजी करू नका, तुमची सगळी जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. माझा भाऊ पाठिशी उभा असल्यासारखे वाटले, अशा शब्दांत एलिझाबेथ यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आल्यावर आनंद व्यक्त केला. विलगीकरणाचा कालावधी संपला असल्याने केंद्रीय आरोग्य विभागाने एलिझाबेथ यांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे. मात्र, टाळेबंदीमुळे त्यांना मुंबईला जाता येत नसल्याने या सर्व प्रवाशांची सोय सदनात करण्यात आली आहे. त्यात इटलीहून आलेले 15 विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याची माहिती सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय यांनी दिली.