महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीलाच CM ठाकरे आणि PM मोदी भेटीचा योगायोग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनावरील अंतिम टप्प्यातील लशीची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि. 28) पुण्यातील सिरम इन्स्टिटयुट ऑफ इंडिया या संस्थेला भेट देणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील मोदींच्या स्वागताला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिल्यास मुख्यमंत्रिपदाच्या वर्षपूर्तीलाच ठाकरे आणि मोदी यांची भेट होणार आहे. कोरोना लशीच्या अनुषंगाने हा योगायोग घडून येणार आहे. यावेळी राज्याकडून होणारे स्वागत स्वीकारताना पंतप्रधान मोदी हेदेखील ठाकरे यांना परतफेड म्हणून ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीच्या शुभेच्छा देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पंतप्रधान मोदी विमानतळावर पोहाेचल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांचे स्वागत करतील. ठाकरे यांच्या पुणे दौ-याला अद्यापही दुजारो मिळाला नसला तरी पंतप्रधानाचे स्वागत राज्यात मुख्यमंत्र्यांकडून होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे मोदींच्या स्वागताला ठाकरे उपस्थित राहतील, असे निश्चित मानले जात आहे. योगायोग म्हणजे 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे सरकारची वर्षपूर्ती आहे. मात्र, ते सिरम इन्स्टिट्यूटच्या भेटीदरम्यान उपस्थित राहतील का, याबाबत काही माहिती मिळू शकली नाही.

तसेच मोदींच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या भेटीदरम्यान राज्यातील इतर कोणते नेते उपस्थित राहणार आहेत, याचीही उत्सूकता राजकीय वर्तुळात आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील सिरम इन्स्टिट्यूटला लसीसंदर्भात दोन वेळा भेट दिली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान तेदेखील उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.