CM ठाकरेंचा PM मोदीवर निशाणा, म्हणाले – ‘हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. वादळात नुकसान झालेल्यांना सरकार नाराज करणार नाही. सरकार त्यांच्यासोबत आहे, जे करता येणे शक्य आहे ते केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान विरोधक दोन दिवसांपासून कोकणात फिरत असताना मुख्यमंत्री 4 तासांचा दौरा करत असल्याच्या टीकेला उत्तर देताना मुुख्यमंत्र्यानी हेलिकॉप्टरमधून पाहणी करुन तर नाही ना गेलो, जमिनीवर उतरलोय असे सांगत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मी विरोधकांना उत्तर देण्यासाठी आलो नाही. माझ्या कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. चार तासांचा दौरा असला तरी फोटोसेशन करण्यासाठी आलो नसल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीत जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मदतीचे आदेश तात्काळ दिले आहेत. पंचनामे येत्या 2 ते 3 दिवसात पूर्ण होतील, त्याचा अहवाल आल्यानंतर आम्ही मदतीसंबंधी निर्णय घेऊ. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन दिले. पॅकेजवर माझा विश्वास नाही. जे गरजेचे आहे ते करणार असल्याचेही ते म्हणाले. मदतीचे निकष बदलण्यासाठी आपण मोदींसोबत झालेल्या बैठकीत सांगितल होते. त्यासंबधी पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पंतप्रधान आपल्याकडे आले नसले तरी ते महाराष्ट्रालादेखील व्यवस्थित मदत केल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला आहे. राज्यातील कोरोनास्थिती संदर्भात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, सध्याचा कोरोना विषाणू फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतो. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे. सध्या गेल्या वेळच्या तुलनेच वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील केल्यानंतर मागील अनुभवातून आपल्याला शहाणे व्हावं लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील, लसपुरवठा अद्यापही सुरळीत होत नसल्याचे ते म्हणाले.