CM योगी आदित्यनाथ यांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणार्‍यास सोडण्यासाठी नाशिकहून :धमकी’ 20 वर्षाच्या तरुणाला अटक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी उत्तर प्रदेश पोलीस मुख्यालयाच्या सोशल मिडिया हेल्पलाईन डेक्सवर देणार्‍यास मुंबई पोलिसांनी पकडले. त्याला सोडून द्या अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकी देणार्‍यास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने नाशिकहून ताब्यात घेतले.

सैय्यद मोहमद फैसल अब्दुल वहाब (वय २०, रा. बांगला नंबर 16,  झिनत मंजिल, दारुसलाम कॉलोनी, मदिना चौक, नाशिक) असे त्याचे नाव आहे. लखनौ पोलीस मुख्यालयातील सोशल मिडिया हेल्प डेस्कवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणार्‍या करमान अमीन खान (वय २५, रा. म्हाडा कॉलनी, चुनाभट्टी, मुंबई) याला मुंबई पोलीस दलातील काळा चौकी युनिटने शनिवारी रात्री अटक केली होती. अंमली पदार्थाचे सेवन करणार्‍या खानने नशेत हा मेसेज केल्याची कबुली दिली आहे.

त्यानंतर अटक केलेल्या आरोपीला सोडून द्या अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा धमकीवजा संदेश एकाने उत्तर प्रदेश पोलिसांच्या सोशल मिडिया डेस्कवर टाकला. त्याची माहिती उत्तर प्रदेश एस टी एफ पथकाने महाराष्ट्र एटीएसला दिली. त्यानंतर नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाने भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सैय्यद बहाब याला ताब्यात घेतले आहे. चौकशीत त्याने असा मेसेज पाठविल्याची कबुली दिली. त्याला पुढील कारवाईसाठी उत्तर प्रदेश एसटीएफ पथकाकडे सोपविण्यात आले आहे.