मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर पडत नाही, उध्दव ठाकरेंनी विरोधकांना दिलं ‘सडेतोड’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री मातोश्री बाहेर पडत नाही, या विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सणसणीत उत्तर दिलं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी पोहचला नाहीत. त्या ठिकाणी मी जाऊन आलोय. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मी त्या भागाचा आढावा घेतलाय. असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना फटकारलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधला. आपल्या 36 मिनिटांच्या संबोधनात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य करत विरोधकांचा समाचार घेतला.

मुख्यमंत्री घरात बसून काम करतात घराबाहेर पडत नाहीत, असा विरोधक माझ्यावर आरोप करत आहत. पण मी व्हिडीओच्या माध्यमातून खेड्यापाड्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो आह. त्या लोकांशी बोलणे गरजेचे आहे. ते काम मी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करत आहे. आरोप करुन काहीही फायदा नाही. आरोप करणारे जिथे गेले नाहीत अशा दुर्गम भागात मी जाऊन आलो आहे. तिथल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना सूचनाही केल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या गोष्टी मी पार पाडल्या असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुबईकरांना दिली गुड न्युज
राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना एक गुड न्युज दिली आहे. लोकलमध्ये आता काही ठराविक लोकांना प्रवास करण्याची मुभा आहे. त्यात इतरांचाही लवकरच समावेश करण्यात येणार आहे. त्या शिवाय लोकलची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून नक्की बोलेल
सारे काही खुले करतो आहोत म्हणजे काही जणांनी पुनश्च राजकारण सुरु केले आहे.मी बोलत नाही म्हणजे माझ्याकडं उत्तर नाही असं नाही.मात्र, महाराष्ट्राच्या बदनामीचा जो डाव आखला जातोय, त्याबद्दल मुख्यमंत्रीपदाचा मास्क उतरवून एकादा मी जरुर बोलणार आहे. पण आज माझ्या दृष्टीने कोरोना महत्त्वाचा आहे.

ठळक मुद्दे

– मी पूर्वी म्हटले होते की तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो. यात आता मी थोडा बदल करुन तुम्ही थोडी जबाबदारी घ्या, असे आवाहन करतो.
– कोरोनावर औषध कधी येणार ? असा प्रश्न विचारला जातोय पण डिसेंबर-जानेवारी पर्यंत ते काही होणार नाही असे दिसते. तोपर्यंत सर्वांनी सदा सर्वदा मास्क लावावा, गर्दी करायची नाही. गर्दीत अंतर ठेवायचे, सतत हात धूत राहणे. सध्या ही त्रिसूत्री हाच उपाय आहे.
– ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’मध्ये आपण 12 कोटी जनतेची आरोग्य चौकशी करतो आहोत. आपला प्रयत्न असा आहे की, महाराष्ट्रातील प्रत्येक घरात दोन वेळा तरी आरोग्य टीम जाईल. प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या वॉर्डाची जबाबदारी घ्यावी. लोकप्रतिनिधींनी मतदारसंघाची जबाबदारी घ्यावी. घरोघर आरोग्य चौकशी केली जाईल.
– कोरोनाच्या संकटात जबाबदारीचा हिस्सा आपण उचला. जरी औषध नसली तरी दररोज हजारो लोक बरे होऊन घरी जात आहेत. सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करुन कोरोना विरूद्धचा लढा आपण जिंकूच.