PM मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ नंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र’, युवकांना पुढं येण्याचं केलं आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला आज (सोमवारी) संबोधित केले. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारतचा दाखला देवुन राज्यातील युवकांना आत्मनिर्भर बनण्याचं आवाहन केले. उद्योगधंद्यांसाठी युवकांनी पुढं यावं असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात ज्या योजना जाहीर करण्यात आल्या त्या कुठल्याही परिस्थिती अंमलात आणणारच असे सांगितले. नवीन उद्योगधंद्यांसाठी राज्यात तब्बल 40 हजार एकर जमिन राखून ठेवण्यात आली आहे. प्रदुषण न करणार्‍या उद्योगांना विनाशर्त परवानगी देण्यात येणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे.

सध्या राज्यात 50 हजार उद्योग सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारनं परवानगी दिली आहे. 7 लाख कामगार तिथं काम करत आहेत. मुंबई, पुणे आणि औरंगाबाद परिसरातील देखील उद्योगधंद्यांना (औद्योगिक कारखाने) परवानगी दिलेली आहे. 40 हजार एकर पेक्षा जास्त जमिन आपण महाराष्ट्रात नवीन उद्योगधंद्यांसाठी राखून ठेवत आहोत. प्रदुषण न करणार्‍यांना उद्योगांना विनाशर्त परवानगी देण्यात आली आहे. नवीन उद्योगांना भाडेतत्वावर जमिन देण्यास राज्य सरकार तयार आहे. मात्र, राज्यामध्ये नवीन उद्योगपर्व सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. ग्रीन झोन हा कोरोनाविरहीत ठेवायचाय त्यासाठी प्रयत्न करायला हवेत तसेच रेड झोन हा ग्रीन झोनमध्ये आणायचा आहे.

इतर कुठेही नसले अशी आरोग्य सेवा आपण उपलब्ध केलेली आहे. आयसीयु बेड आपण तयार केलेले आहेत ही समाधानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रामधील आरोग्यसेवेची आकडेवारी देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली. कोविड योध्दा होण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढं यावं, यापुर्वी केलेल्या आवाहनाला खुप चांगला प्रतिसाद मिळाल्याचा उल्लेख देखील मुख्यमंत्र्यांनी केला. मुंबईमधील कोरोनाबाधितांपैकी 7000 रूग्ण उपचारानंतर बरे होऊन परत घरी गेले आहेत.

आतापर्यंत 5 लाख मजुरांना रेल्वेने आणि बसने स्वगृही पाठवलेले आहे. इतर राज्यातील मजुरांनी रस्त्यावर चालू नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. इतर राज्यातील मजुरांना स्वगृही पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्व जिल्हयातील जिल्हा प्रशासन मजुरांना स्वगृही पाठविण्यासाठी प्रयत्नशील आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मजुरांच्या रेल्वेच्या प्रवासाचे पैसे देण्यात आले आहेत.

राज्यातील लोकांनी अस्वस्थ होवु नये. इतर ठिकाणी म्हणजेच घर सोडून दुसरीकडे अडकलेल्यांना देखील लवकरच स्वगृही पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. राज्यातील लोकांनी देखील रस्त्यावरून फिरू नये असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लॉकडाऊनमधून लवकरात लवकर बाहेर यायचे झाले तर बाहेर पडण्यापुर्वी विचार करावा. एका जिल्हयातून दुसर्‍या जिल्हयात जावु नका. थोडं धीरानं घेतल्यास सर्वकाही ठीक होईल. परदेशातील लोक आपल्याकडे येत आहेत. इथं आडकलेले लोक परदेशात जात आहेत. मात्र, स्थलांतर केल्यानंतर क्वारंटाईन होणं अत्यावश्यक आहे. खास करून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी घाईगडबड करू नये असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे. आपण आहात तिथंच थांबा, अस्वस्थ होऊ नका, आपल्या घरी जाण्याची घाई करू नका असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

घराबाहेर राहताना सावध राहा असं मुख्यमंत्री म्हणाले. एवढे दिवस जी आपण शिस्त पाळली ती आणखी कडकपणे पाळा, धार्मिक सण, उत्सव आणि जमावास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे बाहेर पडताना सावध राहा. बाहेर पडताना मास्क परिधान करा, हात वेळावेळी धुवा असे सांगण्यात आले आहे. आगामी काळामध्ये काही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष कसं सुरू करायचं याबद्दल विचार सुरू आहे. कोरोनाचं संकट कोणत्याही परिस्थितीत पावसाळयापुर्वी संपवायचं आहे. जो पर्यंत तुमचा आणि माझा विश्वासाचा धागा मजबुत आहे तोपर्यंत हे संकट परतवून लावल्याशिवाय राहणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जनजीवन हे रूळावर आणायचे आहे, त्यासाइी काही काळ जाणार, जेवढी सहनशिलता आपण बाळगु तेवढं लवकर हे संकट दूर होईल. सरकार जे काही करतं आहे, पावले उचलतं आहे ते जनतेला धोका होऊ नये म्हणून आणि सर्वांच्या हितासाठी करत असल्याचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.