अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द, सेमिस्टरच्या सरासरी मार्कावरून निकाल : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 30 जून पर्यंत संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. दरम्यान, लॉकडाऊन 5.0 बाबत राज्य सरकारनं आज (रविवारी) नियमावली जाहीर केली. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांबाबत माहिती दिली. दरम्यान, त्यांनी दुर्देवानं महाराष्ट्राला काही आपलेच लोक बदनाम करीत असल्याचं सांगितलं. 65 हजार कोरोनाबाधित रूग्णांपैकी आतापर्यंत 28 हजार रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचं सांगितलं. 1200 रूग्ण हे सध्या गंभीर असून त्यापैकी 200 रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. यापुर्वी व्हेंटिलेटरवर असलेले रूग्ण देखील उपचारानंतर बरे झाले आहेत. पण, काही आपलेच लोक महाराष्ट्राला बदनाम करीत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाच्या नेते मंडळींवर निशाणा साधला आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे आतापर्यंच्या सेमिस्टरचे मार्क काढून सरासरी मार्क देवून त्यांना निकाल देण्यात येणार आहे. ऑनलाइन शिक्षण आपण कसं देऊ शकतो याबाबत माहिती घेण्यात येत आहे. कोणाचंही शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे.

सर्वसामान्यांना सहजपणे कोरोना टेस्ट करून मिळावी यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. यापुर्वी टेस्टींसाठी केवळ 2 लॅब होत्या आता त्याची संख्या 77 वर गेली आहे आणि ती 100 वर जाणार आहे. हॉस्पीटील, बेड्स संपुर्ण राज्यभर वाढवण्यात आले आहेत. जास्तीत जास्त रूग्णांना ऑक्सीजन लागत आहे. त्यासाठी आपण जास्तीत जास्त ऑक्सीजन बेडची सुविधा उपलब्ध करून देत आहोत. महाराष्ट्राने गेल्या दोन महिन्यामध्ये उपचार आणि सुविधांकडे लक्ष दिलं आहे. आपण टास्क फोर्स तयार करून युध्दपातळीवर काम करीत आहे. रूग्ण अगदी शेवटच्या टप्प्यात दाखल होत असल्यानं डॉक्टर देखील हतबल होतात. अंगावर दुखणं काढू नका, वेळत हॉस्पीटलमध्ये जाऊन तपासणी करा असं आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलं आहे. मृत्यूदर खाली आणायचा असेल तर नागरिकांनी लक्षणं आढळली की तात्काळ हॉस्पीटलमध्ये जाऊन तपासणी करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

स्थलांतरित मजूर
आतापर्यंत 16 लाख स्थलांतरित मजुरांना रेल्वे आणि बसेसमधून परराज्यात सोडलं आहे. मी खास करून रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांना धन्यवाद देतो. कारण त्यांनी रेल्वे उपलब्ध करून दिल्या. 11 लाख मजूरांना रेल्वेतून त्यांच्या स्वगृही सोडण्यात आलं तर 43500 बसेसव्दारे 5 लाख 25 हजार मजुरांना स्वगृही सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत मजूरांना घरी पोहचण्यावर 85 ते 90 कोटी रूपये खर्च राज्य शासनानं केला आहे.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द

शैक्षणिक वर्षाबाबत विचार सुरू आहे. अंतिम वर्षातील परिक्षेबाबत कालच बैठक घेण्यात आली. आता तात्काळ परिक्षा घेणं योग्य नाही. आम्ही देखील पालक आहोत असं मुख्यमंत्री म्हणाले. अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यापुर्वी जेवढे सेमिस्टर झाले आहेत त्याचे मार्क काढून त्यावरून सरासरी मार्क देवून त्यांचा निकाल देण्यात येणार आहे.. आपण हा निर्णय घेतलेला आहे. शिक्षणाचा खेळखंडोबा आमचं सरकार होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. ज्यांना जास्त मार्क मिळवण्याची इच्छा असेल तर त्यांना परिस्थिती पाहून नंतर परिक्षा घेण्यात येईल अशी देखील व्यवस्था करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 352 कोटी जमा

352 कोटी रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा झाले असून त्यापैकी 111 कोरोनावर खर्च करण्यात आले आहेत. आगामी काळात आरोग्य सुविधेला अधिक महत्व देण्यात येणार असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राज्यभर आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी सरकार मोठी पावले उचलत असल्याचं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.