मराठा आरक्षणाबाबत आज होणार CM ठाकरे आणि फडणवीस यांच्यात चर्चा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्यामुळे राज्यात राजकारण तापले आहे. त्यापाश्वर्र्भूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात मराठा आरक्षणप्रश्नी आज रात्री साडेआठ वाजता चर्चा होणार आहे.

मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे मराठा समाजातील नाराजी वाढत असून अकरावी, पदवी व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे. या पेचातून मार्ग काढण्यासाठी अध्यादेश काढण्यासह वेगवेगळे पर्याय पुढे आले आहेत. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे हे फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत.

फडणवीस गेले चार-पाच दिवस बिहार दौर्‍यावर असल्याने ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरूनही संभाषण केले आहे. दरम्यान, सर्व पक्षांनी मिळून मराठा आरक्षणासाठी काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्रयांनी केले आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षानेत्यांसोबत त्यांच्या बैठकीत का चर्चा होणार याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.