… तर लवकरच राज आणि CM उध्दव ठाकरे एकत्र दिसणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे लवकरच एकत्र दिसणार आहेत. मुंबई महापालिकेच्या वतीने कुलाबा येथे उभारलेल्या शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव यांच्या हस्ते शनिवारी (दि. 23) करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे यांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी निमंत्रण दिले आहे. कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याआधी दीड वर्षांपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली होती. शिवाजी पार्कमध्ये उद्धव यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याचे आमंत्रण राज यांना दिले होते. त्यावेळी राज ठाकरे उपस्थित होते.

महापौर पेडणेकर यांनी अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बाळासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण कायर्क्रमाचे निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरेंची भेट घेतली. घरी आलेल्या पाहुण्यांच अगत्य करणे हे ठाकरे कुटुंबाचे वैशिष्ट्य आहे. कृष्णकुंजवर त्याचा अनुभव आला. राज ठाकरेंनी आमच्यासोबत 10 ते 12 मिनिट संवाद साधला. यावेळी बाळासाहेबांच्या अनेक आठवणी त्यांनी आम्हाला सांगितल्या असे पेडणेकर म्हणाल्या.

या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता आहे. या आधी मे महिन्यात राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांची मंत्रालयात बैठक बोलावली होती. मात्र त्या बैठकीला उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला स्थानिकांचा विरोध आहे. बाळासाहेबांचा पुतळा रहदारी असलेल्या भागात आहे. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका होऊ शकतो, असा आक्षेप स्थानिकांसह आपली मुंबई संस्थेने नोंदवला आहे.