Coronavirus : ‘कोरोना’ तपासणीबाबत मुख्यमंत्री ठाकरेंची महत्वाची घोषणा (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. आता हा जीवघेणा व्हायरस भारतात येऊन धडकला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून राज्य सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात त्यांनी पुणे, मुंबई, नागपूर येथे कोरोनाच्या तपासणीसाठी केंद्र सुरु करण्यात आली असल्याची घोषणा केली. तसेच पुढील 10 ते 15 दिवस काळजी घेण्याची आवश्यकता आहे, मास्क लावून फिरण्याचे काही कारण नाही. केवळ डॉक्टर आणि विमानतळावर तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मास्क लावण्याची आवश्यकता आहे.

होळीच्या उत्सवात अनावश्यक गर्दी टाळा. ताप, अंगदुखी, कफ ही प्राथमिक लक्षणे आहेत. डायबिटीस, प्रतिकार शक्ती कमी असेल तर त्यांनी काळजी घ्यावी. एन 95 मास्क लावण्याची आवश्यकता नाही. हात धुणे अत्यंत महत्वाचे आहे. हात धुण्यासाठी साबण नसेल तरी चालेल, स्वच्छ पाण्याने हात धुवा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेतही कोरोनावर निवेदन दिले आहे. यावेळी कोरोनाला न घाबरता संकटांचा सामना करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. राज्यात भीतीचे वातावरण नसल्याचे ते यावेळी म्हणाले. कोरोनामुळे भयभीत न होता संकटाचा मुकाबला केला पाहिजे. भयभीत झाल्याने चुका होतात असे ते म्हणाले. दरम्यान कोरोनाशी दोन हात करण्यासाठी होळी मर्यादेत खेळा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

पंतप्रधान मोदींचा बेल्जियमचा दौरा काही काळासाठी रद्द –
पंतप्रधान मोदींचा बेल्जियमचा दौरा काही काळासाठी रद्द करण्यात आला आहे. याशिवाय गृहमंत्री अमित शाह यांनी हैद्राबादमधील सभा रद्द करण्यात आली आहे. दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लोक मोठ्या प्रमाणात मास्कची खरेदी करत आहेत. त्यामुळे बाजारात मास्कच्या किंमती देखील वाढल्या आहेत.