CM उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवला असून आज शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज फसवे आहे , अशी टीका विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी केवळ बहाणे शोधले आहेत. यापूर्वी २५ हजार आणि ५० हजार हेक्टरी मदतीची मागणी ठाकरे यांनीच केली होती. फळबागांसाठी तर १ लाखापर्यंतची मदत त्यांनीच मागितली होती. पण, आता ती मदत द्यायची नाही, म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत, असे फडणवीस यांनी पत्रकात म्हंटले आहे.

किमान शेतकऱ्यांच्या बाबतीत तरी आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता अशा काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील असे वाटले नव्हते. हा शेतकऱ्यांसॊबत झालेला मोठा विश्वासघात आहे. निसर्गाने तर अन्याय केलाच आहे; आता सरकारही सूड घेत असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

You might also like