खातेवाटप रखडलेलचं, फक्त पालकमंत्रीपदाचा ‘फॉर्म्युला’ ठरला

मुंबई : पोलीनामा ऑनलाइन – महिना उलटल्यानंतर महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेले नसल्याने बिन खात्याचे मंत्री असा टोला विरोधकांकडून लगावण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री तब्बल पाच तास झालेल्या बैठकिमध्ये पालकमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला. त्यामुळे महाविकास आघाडीचा खातेवाटपचा घोळ अद्यापही सुरुच आहे.

काँग्रेसने ताणून धरल्याने हे खातेवाटप रखडल्याची माहिती सुत्रांनी दिली. काँग्रेसला त्यांच्या वाट्याला आलेल्या खात्यांमध्ये बदल पाहिजे असून शिवसेना किंवा राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्यांपैकी दोन महत्त्वाची खाती पाहिजे आहेत. जवळपास सर्व खातेवाटप पूर्ण झालं असा दावा काँग्रेसचे मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल केला होता. आज (शुक्रवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खातेवाटप करतील असेही काही नेत्यांनी सांगितले होते.

आघाडीचे खातेवाटप रखडलेलं असतानाच गुरुवारी झालेल्या बैठकित पालकमंत्रिपदाबाबत फॉर्म्युला ठरल्याची माहिती सुत्रांनी दिली. पालकमंत्र्यांचा फॉर्म्युला 13-13-10 हा असण्याची शक्यता आहे. शिवसेना 13, राष्ट्रवादी 13 आणि काँग्रेस 10 अशी वाटणी करण्यात आली. आमदारांच्या संख्याबळानुसार पालकमंत्री प्रत्येक पक्षाला मिळणार आहेत. पालकमंत्री पदावरून वाद होत होते मात्र ते मिटवण्यात आले आहे. स्थानिक प्रश्न सोडवण्यात पालकमंत्र्यांची महत्त्वाची भूमिका असल्याने बालेकिल्ला असलेल्या जिल्हा आपल्याला मिळावा अशी तीनही पक्षांची मागणी आहे.

गुरुवारी झालेल्या बैठकिनंतर आज (शुक्रवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खाते वाटप जाहीर करतील असे सांगण्यात येत आहे. मात्र खातेवाटपावरून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाद झाल्याची माहिती सुत्राकडून देण्यात येत आहे. चव्हाण यांना कृषी, महसूल किंवा इतर सामान्य महत्त्वाचे खाते पाहिजे.  अजित पवारांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख केल्यानंतर अशोक चव्हाण अजित पवार यांच्यावर संतापले. ते म्हणाले पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात नाही. मग त्यांचा येथे काय संबंध ? मी देखील माजी मुख्यमंत्री असून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे तुम्हाला जे बोलायचे ते या बैठकीत समोर असणाऱ्यांशी बोला असे त्यांनी पवारांना सुनावले. यावर पृथ्वीराज चव्हाण हे संयमी नेते असल्याचे पवारांनी म्हटले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/