उद्धव ठाकरेंचा राणेंवर निशाणा ! म्हणाले – ‘तुम्हीच सच्चे शिवसैनिक, काही जण केवळ स्वतःचा विचार करतात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाइनद्वारे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तुम्ही सच्चे शिवसैनिक आहात. कोकणासाठी तुम्ही मागणी केली, अन्यथा काही जण केवळ स्वतःसाठी मागत असतात, अशी जोरदार टीका ठाकरे यांनी राणे यांचे नाव न घेता केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन केल्यानंतर म्हणाले की, या योजना पूर्ण झाल्यानंतर मी स्वत: उद्घाटन करण्यासाठी कोकणात येईन. अनेकदा योजनांची घोषणा केली जाते. भूमिपूजन केले जाते आणि पुढे काम होत नाही. परंतु, आपल्या महाविकास सरकारकडून तसे होणार नाही. या योजनांचा शुभारंभ झाला आहे. त्या आपण पूर्ण करणार आहोत, असे आश्वासन ठाकरे यांनी उदघाटना दरम्यान दिले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तुम्ही सच्चे शिवसैनिक आहात. त्यामुळेच तुम्ही स्वत:साठी काही मागितले नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. तर तुम्ही रत्नागिरीसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मागितले. तुम्ही स्वत:साठी काही मागू शकला असतात. मात्र, तसे केले नाहीत. काही जण असतात, इकडे-तिकडे काही करून स्वत:साठी काही ना काही तरी मागतात. तुम्ही मात्र कोकणासाठी मागितले. याचा मला अभिमान वाटतो. असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, मेडिकल कॉलेजची घोषणा आजही मी करू शकतो. मात्र, मला खोटे बोलता येत नाही. कोकणात कॉलेज करायचे हे माझ्या लक्षात आहे. हे काम करू शकतो की नाही, याची खात्री होत नाही, तोपर्यंत मी तुम्हांला शब्द देणार नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे.