Maratha Reservation : ‘देवेंद्र फडणवीस सरकारचा मराठा आरक्षण कायदा फूलप्रूफ नव्हता’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मराठा आरक्षणाबाबत काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.11) राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं. हे आरक्षण राष्ट्रपतींच्या माध्यमातून दिलं जावं यासाठी हे निवेदन देण्यात आलं आहे. आता लवकरच यासाठी पंतप्रधान मोदींची देखील भेट घेतली जाणार आहे. राज्यपालांना निवेदन सादर केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आधी केलेला कायदा फूलप्रुफ नव्हता. तो जर फुलप्रूफ असता तर या कारणासाठी पुन्हा राज्यपालांची भेट घेण्याची वेळ आमच्यावर आली नसती, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

मराठा आरक्षणाचा कायदा विधिमंडळात सर्व पक्षांनी एकमुखाने संमत केला आहे, जनतेच्या भावनांचा आदर ठेवून हा निर्णय झाला, तो न्यायालयात टिकला नसला तरी सरकार म्हणून आम्ही सर्व या समाजाच्या भावनांशी सहमत आहोत. न्यायालयाने याबाबतीत केंद्राला अधिकार आहेत असे सांगतिले आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेतली. राज्यपालांनी देखील आमचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतले असून ते केंद्राला आमच्या भावना कळवतील, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.