‘ठाकरे सरकार’मध्ये काँग्रेस नेत्यांना ‘घर’-‘घर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे यांनी भाजपाला झुगारून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली. मात्र शिवसेनेला ही तीन पायांची शर्यत टिकवण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना सतत विश्वासात घेऊन शिवसेनेला प्रत्येक काम करावे लागणार आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील मंत्र्यांना शासकीय निवासस्थानांचे वाटप करण्यात आले. मात्र काँग्रेस नेत्यानमध्ये सध्या बंगल्यांवरून भलतीच घर घर पहायला मिळत आहे. कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांना पहिल्यांदा चित्रकूट बंगला देण्यात आला होता. मात्र, 24 तासांत पुन्हा नवीन अध्यादेश काढत राऊत यांना चित्रकूटऐवजी पर्णकुटी हा शासकीय बंगला देण्यात आला आहे. राऊत यांना आधी दिलेला चित्रकूट बंगला हा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना आता देण्यात आला आहे.

चित्रकूट बंगल्यावरून राऊत नाराज होते. त्यामुळे 24 तासांत पुन्हा नवीन जीरआर काढत त्यांना नवा बंगला दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे मात्र काँग्रेस ज्येष्ठ नेते गट नेते बाळासाहेब थोरात अजून शासकीय बंगल्याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे आता बंगल्यावरून काँग्रेस मंत्री भलतेच नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 4 मंत्री आणि 1 विरोधी पक्ष नेत्यांच्या शासकीय निवासस्थानाचे वाटप केले. यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची नावे होती, मात्र काँग्रेसचे नवनिर्वाचित मंत्री बाळासाहेब थोरात अजूनही घराच्या प्रतिक्षेत आहेत. खात्याच्या वाटपासोबत शासकीय निवास्थान देखील मिळण्यात उशीर होत असल्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये मोठी नाराजी असल्याचे एका नेत्याने स्पष्ट केले आहे.

दिल्लीतील लॉबिंगवर भर –

मंत्रिमंडळ विस्ताराआधी काँग्रेस नेत्यांच्या दिल्ली वाऱ्यांना सुरुवात झाली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अर्धा तास चर्चा केल्याचे समजते. तर नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे देखील दिल्लीला रवाना झाल्याचे समजते ते देखील सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तसेच मंत्री नितीन राऊत हे देखील लवकरच दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

Visit : policenama.com