‘PM मोदींच्या धोरणांवर बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही’ : नारायण राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या धोरणांवर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नाही. एवढंच नाही तर हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठीही लायक नाही असंही ते म्हणाले आहेत. दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे ताळमेळ नसलेलं, निर्बुद्ध आणि शिवराळ बरळणं होतं. मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीनं कसं बोलावं याचं उद्धव ठाकरेंना भान नाही. उद्धव ठाकरे म्हणजे पुळचट माणूस अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

रविवारी उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात आपल्या भावना मांडल्या. यावेळी त्यांनी नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना बेडूक आणि बेडकाची पिले अशी अप्रत्यक्ष उपमा दिली होती. याच टीकेला आता नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांना उपरोधिक टोला लगावत नारायण राणे म्हणाले, “कालच दसरा मेळावा म्हणजेच 47 शिवसैनिकांमध्ये झालेली भव्य सभा होती. आजवर महाराष्ट्रात जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या कार्यानं आणि भाषणशैलीनं देशात राज्याची प्रतिष्ठा वाढवली. याला सध्याचे मुख्यमंत्री अपवाद आहेत. तेच उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका करतात. मोदींच्या धोरणांवर टीका करण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नाही आणि त्यांनीच महाराष्ट्राचा कारभार सांभाळावा” असं नारायण राणे यांनी सांगितलं.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

“गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पोरं डराव डराव करत आहेत. आपण गोष्टीत बेडकीनं बैल पाहिला हे ऐकलं असेल परंतु या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्लं आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकानं ओरडायचा प्रयत्न केला. पंरतु त्याचा आवाज आता चिरका झालाय.”