उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ‘शिवनेरी’वरून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा करणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरुन शिवनेरी गडावरुन उद्धव ठाकरे सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याचे संकेत देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शिवनेरी गडावर जाणार आहेत यावेळी सर्वाचे लक्ष लागून असेल ते शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या घोषणेकडे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच दौरा असणार आहे. तसेच ते एकवीरा देवीच्या दर्शनाला जाणार आहेत.

उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगितले होते की मुख्यमंत्री झाल्यावर शिवनेरीवर जाणार आहेत. तसेच कुलदैवत एकवीरा आईचे दर्शन घेणार आहेत. त्यानुसार उद्धव ठाकरेंचा दौरा निश्चित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरीव मदत देणार असे सांगितले होते. शेतकऱ्यांना तुटपूंजी मदत नाही तर भरीव मदत करण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार असून आता पर्यंत शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या योजना आणि त्यांची अंमलबजावणीसाठी लेखाजोखा करुन प्रशासनाला सूचना करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले.

महाविकास आघाडीच्या या महत्वाकांक्षी निर्णयासाठी शेतकरी कर्जमाफीसाठी 60 हजार कोटींचा निधी लागणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला हा निधी कर्जाच्या स्वरुपात उभारावा लागणार आहे. त्यामुळे सुमारे पावणेपाच लाख कोटी रुपयांचा बोजा वाढेल.

Visit : policenama.com