CM उध्दव ठाकरेंकडून विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काही वेळापूर्वीच विधान भवनात येऊन त्यांनी विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे हा अर्ज सोपवला. त्यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते उपस्थित होते.

राज्य विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी महाविकास आघाडीने ५, तर भाजपनं ४ जणांना उमेदवारी दिल्यानं ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. तसंच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मावळत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी उमेदवारी अर्ज भरला.

रविवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या घटक पक्षांच्या बैठकीनंतर काँग्रेसनं विधान परिषदेची एकच जाग लढविण्याचा निर्णय घेतल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत नऊ जणांची निवड बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं. सध्या आपण कोरोना संसर्गाशी मुकाबला करत आहोत, अशा स्थिती मध्ये निवडणूक बिनविरोध व्हायला हवी यासाठी काँग्रेस एकच जागा लढवेल, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल स्पष्ट केलं.

दरम्यान, शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे हे निवडणूक लढणार आहे तर काँग्रेसने राजेश राठोड आणि राजकिशोर (पापा) मोदी यांना उमेदवारी घोषित केली होती. मात्र आता फक्त राजेश राठोड हे काँग्रेसचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी मंत्री शशिकांत शिंदे व अमोल कोल्हे यांना उमदेवार दिली आहे. तसंच भाजपने रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछेडे आणि प्रवीण दटके यांना उमदेवार दिली आहे.