संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर CM ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. त्यामुळे ठाकरे सरकार बॅकफूटवर गेले आहे का, अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राठोड प्रकरणावर भाष्य केले. याशिवाय राज्यातील कोरोना स्थिती, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन यावर देखील भाष्य केलं.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आमची जबाबदारी न्यायाने वागणे ही असते. तपास हा झालाच पाहिजे आणि कोणी दोषी असेल तर शिक्षाही झाली पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. मात्र, कोणाला मुद्दाम अडकवता कामा नये. पोलिसांना नि:पक्ष चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या काळातही हीच पोलीस यंत्रणा होती. मात्र आता ते पोलिसांवरच अविश्वास दाखवत आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली.

राज्यातील विरोधी पक्ष दुतोंडी
कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याचा खोटा आरोप केला. धारावी पॅटर्नचं जागतिक पातळीवर कौतुक केलं. सरकारचं सोडा पण तुम्ही कोविड योद्ध्यांची थट्टा करताय. असा दुतोंडी विरोधी पक्ष महाराष्ट्रानं कधी अनुभवला नाही. सावरकरांची जयंती की पुण्यतिथी हे आधी त्यांनी ठरवावं. कर्नाटकात तुम्ही आहात, खाली वर तुम्ही आहेत सीमा प्रश्न का सोडवला नाही, असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

केंद्रातील सरकार ओरबाडायला बसलेय
आम्ही आतापर्यंत सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांची शतके पाहिली. मात्र, पेट्रोल दराने गाठलेले शतक पहिल्यांदाच पाहिले. अनेक प्रश्नांवर आंदोलन करत असलेले विरोधक पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीसंदर्भात गप्प का बसतात. इंधन दरवाढ विरोधात त्यांनी आंदोलन करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिले. केंद्रातील सरकार सगळ ओरबाडायला बसलेय. केंद्राच्या सोयीनुसार आणि त्यांच्या तुंबड्या भरणारी कररचना केली जाते. जीएसटीचे अद्यापही 29 हजार कोटी रुपये राज्याला येणे बाकी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.