ठाकरे सरकारचा निर्णय ! फडणवीस सरकारच्या काळातील वादग्रस्त ‘महापोर्टल’ अखेर बंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – परिक्षार्थींनी वारंवार महापोर्टलमध्ये त्रुटी असल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सरकारनं हे पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फडणवीस सरकारच्या काळात महापोर्टलद्वारे सरकारी नोकरभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महापोर्टलद्वारे सरकारी भरती करण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आला होता. मात्र, यामध्ये अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी परिक्षार्थींकडून करण्यात आल्या होत्या. महापोर्टल बंद करण्याची मागणीही अनेकदा करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महापोर्टल बंद करण्याचे निवेदन दिले होते. तसेच युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता. अखेर विद्यार्थी आणि या नेत्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. महापोर्टल बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यासंबंधीचं परिपत्रक आज सरकारच्या वतीने काढण्यात आलं.

सरकारने महापरीक्षा पोर्टल स्थगित केले असले, तरी रद्द करण्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सरकारने तातडीने महापरिक्षा पोर्टल बंद करण्याविषयी घोषणा करावी अशी मागणी सत्यजीत तांबे यांनी केली होती. तसेच या परीक्षा घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करावी आणि फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या भरत्यांमध्ये झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करावी, अशी मागणीही तांबे यांनी केली होती.