‘जे कोण ‘थिल्लर-चिल्लर’ आहेत, मला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही’, CM ठाकरेंचा फडणवीसांवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   राज्याला अतिवृष्टीचा फटका बसल्यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी करत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर यांच्यावर टीका केली होती. राज्य चालवायला हिंमत लागते. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी थिल्लरपणा करू नये असं टीकास्त्रही फडणवीसांनी सोडलं होतं. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील याला उत्तर देत निशाणा साधला आहे.

जे कोण थिल्लर चिल्लर आहेत, मला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. सध्या सीए ठाकरे हे अतिवृष्ठी झालेल्या शेतीच्या नुकसानीची पहाणी करत आहेत. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी पूर आणि अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भेटलो. त्यांच्याशी संवाद साधला. जी काही जास्तीत जास्त मदत करता येईल ती करणार आहोत. नुकसान मोठं आहे. मी इथं दौरा करत आहे आणि तिकडं मदत कशी आणि कधी करावी यासंदर्भात कामही सुरू झालं आहे. पंचनामे जवळपास झाले आहेत. त्यामुळं नुसता विचार नाही तर प्रत्यक्ष मोबदला कसा द्यावा ते आम्ही पहातो आहोत” असंही ठाकरेंनी सांगितलं.

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी केंद्र सरकार राज्याला सहाय्य करेलच. परंतु राज्य सरकारनं टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत द्यावी. सोयीस्कर भूमिका घेऊ नये . सगळंच केंद्रावर ढकलायचं असेल तर मग राज्य सरकार कशासाठी आहे. त्यांचं काम काय असे प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केले आहेत. अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी फडणवीस यांनी पावसाच्या पाण्यातून आणि चिखलातून मार्ग काढला.