‘मातोश्री’वरून बारामतीला फोन ! ‘आमचे नगरसेवक परत पाठवा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  पारनेर तालुक्यात शिवसेनेला रामराम ठोकत पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांनी 4 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, आता शिवसेनेने पाच नगरसेवक परत पाठवा, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना दिला आहे. मात्र, हा निरोप शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत फोन करून अजित दादांना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यामध्ये नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी आमदार आणि मंत्री विजय औटी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी बारामतीत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी पारनेर तालुक्यातील शिवसेनेकडून निवडून आलेल्या पाच नगरसेवकांना बरोबर आणत थेट राष्ट्रवादीत प्रवेशही घडवून आणला. यामुळे पारनेरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पारनेरमध्ये राष्ट्रवादीची ताकत वाढली असल्याचे बोलले जात आहे.