Pune News : ‘येरवडा कारागृह न राहता संस्कार केंद्र बनवू’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  “येरवडा तुरंगात चाफेकर होते. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी होते. कालांतराने इंग्रज निघून गेले. पण या खडतर इतिहासानेच भारत घडला. जेल पर्यटन मधून दोन गोष्टी साध्य होतील. एकतर या स्वातंत्र सैनिकांनी घेतलेलं कष्ट दिसून येतील, तसेच या सगळ्यांचे झालेले हाल दिसून येतील,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ‘जेल पर्यटना’चे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, जेल पर्यटनातून येरवड्याच्या भिंतीसुद्धा बोलू लागतील. त्या इतिहास सांगतील. आणखी मुद्दा म्हणजे या कारागृहात असलेल्या कैद्यांच्या शक्तीचा वापर कसा करायचा, यावर विचार करायला हवा. भरकटलेल्या कैद्यांना मार्गावर आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील. येरवडा तुरुंगात असे काही उपक्रम राबवू ज्यामुळे येरवडा ‘तुरुंग’ न राहता ते ‘संस्कार केंद्र’ बनेल. सरकारकडून असे अभिनव उपक्रम राबवू, की थोड्या दिवसांनी बाहेर पडणाऱ्या कैद्यांना संस्कारक्षम बनवता येईल.

तसेच येरवड्यातून बाहेर पडणे म्हणजे संस्कार केंद्रातून आलो असे वाटायला हवे, असे प्रयोग करु, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. या जेल पर्यटनाच्या उपक्रमाबद्दल गृहमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले.

याबाबत बोलताना गृहमंत्री देशमुख म्हणाले, शाळा कॉलेज व शैक्षणिक अस्थापना तसंच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ही ऐतिहासिक ठिकाणी पाहता यावीत या दृष्टीकोनातून गृह विभागाद्वारे जेल पर्यटन सुरु करण्यात येत आहे. तसेच येरवडा कारागृहापाठोपाठ राज्यातील इतरही कारागृहांमध्ये अशाच प्रकारे पर्यटन सुरु करण्याचा विचार असल्याचं त्यांनी सांगितले.

कसे असेल ‘जेल पर्यटन’ !

यासाठी पर्यटकांना त्यांच्या संस्थेच्या लेटरहेडवर पर्यटक म्हणून भेट देणाऱ्या व्यक्तींची नावे व मूलभूत तपशील देणे गरजेचे आहे. अधिक्षक येरवडा कारागृह यांच्या [email protected] किंवा [email protected] या मेलवर अथवा प्रत्यक्षपणे कारागृह येथे किमान सात दिवस अगोदर अर्ज करावा लागेल. कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, बॅगेज, मोबाईल फोन, कॅमेरा, पाण्याची बाटली किंवा कोणतीही वस्तु कारागृहाच्या आतमध्ये नेता येणार नाही, याची नोंद घ्यावी. कारागृह प्रशासनाने फोटोग्राफी तसेच व्हीडीओग्राफीची व्यवस्था केलेली असुन ते कारागृहातुन बाहेर पडल्यानंतर पुरविण्यात येईल. पर्यटकांना माहिती देण्यासाठी पर्यटन गाईड पुरविला जाईल. दररोज भेट देण्याच्या पर्यटकांची संख्या ५० पेक्षा जास्त असणार नाही.