Pooja Chavan Suicide Case : मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर आलेल्या संजय राठोडांना दिले गेले स्पष्ट संकेत ?

पोलिसनामा ऑनलाईन – पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांचे नाव चर्चेत आले. आणि सर्वत्र खळबळ उडाली. संजय राठोड हे १५ दिवस समोर न आल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. पूजाचे समोर आलेले नवे फोटो, ऑडिओ क्लिप यांच्यामुळे राठोड यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षावर पोहोचले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कृतीतून राठोड यांना स्पष्ट संकेत दिल्याचं बोललं जात आहे.
मुख्यमंत्री ठाकरे संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी आलेल्या राठोड यांना दीड तास ताटकळत ठेवलं. यानंतरही मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना केवळ २ मिनिटांचा वेळ दिला. अवघी २ मिनिटं बोलून मुख्यमंत्री तिथून निघून गेले.

संजय राठोड वर्षा बंगल्यावर गेले त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे संजय राठोड यांना बराच वेळ वाट पाहावी लागली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते, ऊर्जामंत्री नितीन राऊतदेखील वर्षा बंगल्यावर पोहोचले. संजय राठोड आणि त्यांच्यात काही चर्चा झाली का, याबद्दलची माहिती समजू शकलेली नाही. शिवसेना नेतृत्वानं संजय राठोड यांना योग्य तो संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राठोड यांच्यावर मुख्यमंत्री ठाकरेंकडून कारवाई केली जाऊ शकते.

शिवसेना संजय राठोड यांच्यापासून अंतर राखत असल्याचं काल नागपुरात दिसून आलं. मुंबई गाठण्यासाठी राठोड यवतमाळमधून नागपूर विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी तिथे एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता. संजय राठोड नागपूरचे संपर्कमंत्री असूनही त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर एकही शिवसैनिक उपस्थित नसणं ही बाब लक्षणीय मानली जात आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असताना वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीच्या दर्शनाला गेले. तिथे त्यांचे हजारो समर्थक जमले होते. त्यांच्या माध्यमातून राठोड यांनी शक्तिप्रदर्शन केलं. माझा समाज माझ्या सोबत असल्याचा सूचक संदेश राठोड यांनी शक्तिप्रदर्शनातून दिला. ही बाब शिवसेना नेतृत्त्वाला रुचलेली नाही. त्यामुळेच राठोड यांच्यापासून पक्षानं दोन हात लांब राहून फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यास सुरुवात केली आहे.