Jalgaon News : ‘त्या’ अपघातातील मृतांबद्दल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक ! जखमींना उपचार खर्च व वारसांना सरकारी मदत जाहीर

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – तालुक्यातील अभोडा, विवरे, केऱ्हाळे, रावेर येथील हातावर पोट असणारे मजुर बायका-पोरांसह धुळे जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पपई भरून आणण्याच्या हातमजुरीसाठी नेहमीप्रमाणे जात असताना भीषण अपघात झाला. एक दाम्पत्य, तीन कुटु्ंबातील मायलेकी व मायलेकांसह 11 जण अभोडा येथील, रावेर येथील 2 तर केऱ्हाळे, विवरे येथील एकेक जण असे एकूण 15 जण या अपघातात जागीच ठार झाले. पपईनं भरलेला ट्रक किनगावनजीक पलटल्यानं हा अपघात झाला. आज पहाटे ही दुर्दैवी घटना घडली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची दखल घेतली आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

आता मृतांच्या वारसांना सरकारकडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. इतकंच नाही तर जखमींवरील उपचाराचा खर्चही शासन करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाकडून या घटनेची माहिती घेतली असून संबंधित अपघातग्रस्तांना सर्व ती आवश्यक मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत याबाबत माहिती देण्यात आली आहे.

मृतांमध्ये अशोक जगन वाघ (वय 40) संगिता अशोक वाघ (25) या दाम्पत्यासह त्यांचा लहान मुलगा सागर अशोक वाघ (वय 3 वर्षे), नरेंद्र वामन वाघ (वय 25), हे एकाच परिवारातील 4 सदस्य कमलाबाई रमेश मोरे (45) यांची शारदा रमेश मोरे (वय 15) व गणेश रमेश मोरे (वय 5) हे दोन्ही मुलं मुली, संदीप युवराज भालेराव (25) व दुर्गाबाई संदीप भालेराव (20) हे दाम्पत्य, सबनूर हुसेन तडवी (53) व दिलदार हुसेन तडवी हे मायलेकांसह रावेर येथील शेख हुसेन शेख मण्यार फकरीवाडा रावेर, दिंगबर माधव सपकाळे, वय 55 रावेर, केऱ्हाळे येथील सर्फराज कासम तडवी (32) अशा 15 जणांचा समावेश आहे. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर अभोडा गावासह सर्वत्र शोककळा पसरली. इतकंच नाही तर आज पहाटे गावात एकही चूल पेटली नाही.