संडे स्पेशल : मुख्यमंत्र्यांच्या ‘चौफेर’ फटकेबाजीनं विरोधक ‘नामोहरण’ ! उद्धव ठाकरे यांचं नवं ‘रुप’ अधिवेशनात समोर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलेच अधिवेशन होते. सहा दिवसांचे छोटेखानी अधिवेशन असले तरी सर्व झोत ठाकरे हे संसदीय राजकारणात नवखे असल्याने ते अधिवेशनाला विशेषत: माजी मुख्यमंत्री आणि आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कसे सामोरे जातात, याकडे लक्ष लागले होते. फडणवीस यांच्यासह भाजपाचे अनेक नेते हे फर्डे वक्ते म्हणून ओळखले जातात. फडणवीस यांनी तर गेल्या ५ वर्षात राज्यभर फिरुन आपल्या वक्तृत्वाची प्रचिती दिली आहे. त्यामानाने उद्धव ठाकरे हे कधीही उत्तम वक्ते म्हणून गणले जात. भाषणातून दुसऱ्यांवर कुरघोडी करण्याचा त्यांनी आपल्या जाहीर भाषणातून कधी परिचय दिला नव्हता. त्यामुळे विरोधकांच्या तोफखान्याला ते कसे तोड देणार याकडे अगदी शिवसेना नेत्यांसह सर्वांचे लक्ष लागले होते.

नागपूर विधीमंडळाच्या या सहा दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमीपेक्षा वेगळेच भासले. संसदीय राजकारणात एखाद्या कसलेल्या नेत्यांप्रमाणे त्यांनी कविता, दोहे यांचा आधार घेत विरोधक असलेल्या आपल्या पूर्वीच्या भाजपा मित्रांना नामोहरण करुन टाकले.

शिवसेनेच्या जाहीर सभांमधून त्यांचे भाषण म्हणजे कठोर शब्दात टिका, गर्जना असे असत. मात्र, सभागृहात त्यांचे वेगळेच रुप सर्वांनी पाहिले. अगदी तुकडोजी महाराज यांच्या कवितेचा संदर्भ देत त्यांनी विरोधकांना विशेषत: देवेंद्र फडणवीस यांना घायाळ केले.

ठाकरे यांनी दिलेली उत्तरे, सभागृहात केलेले निवेदन यामध्ये कोठेही बडेजाव नव्हता की मी आता मुख्यमंत्री आहे, असा अहमभाव नव्हता. उलट विरोधकांना विशेष: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका बाजूला मोठेपणा देऊन त्यांच्यावर साध्या सरळ शब्दात टिका करुन भाजपाची बोलती बंद केली. मोदी हे जागतिक नेते आहेत, असे सांगून मंगोलियाला ४ लाख कोटी डॉलर देतात. मग महाराष्ट्राला का देऊ शकत नाहीत, अशा शब्दात त्यांनी भाजपाला टोला लगावला.

७० वर्षात काँग्रेसने काय केले, असा हस्स्यास्पद प्रश्न विचारण्यात भाजपा नेत्यांना मोठे भूषण वाटते व आम्हीच देशाचा आता विकास करु लागलो, अशी शेखी मिरविण्याची मोठी हौस आहे. विदर्भाच्या विकासाबाबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस तुम्ही काम केलेले नाही असे मी कुठेही म्हटलेले नाही. विदर्भाचा तुमचा इतका माझा अभ्यास नाही. विदर्भाच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीसजी मला तुमची मदत लागेल असे सांगत त्यांची बोलती बंद केली. त्याचवेळी तुमच्या काळात विदर्भाचा विकास झालेला नाही. मी विदर्भाचा नातू आहे. त्यामुळे माझ्यासाठी आजोळचे आशीर्वाद महत्वाचे आहेत, असे सांगितले. त्यांच्या शब्दात विरोधकांना नामोहरण करण्याबरोबर जो प्रामाणिकपणा जाणवतो, तो विरोधकांनाही भावला.

देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या प्रत्येक निर्णयावर जोरदार भाषणे ठोकत विरोध केला. पण, त्याला अतिशय समर्पक शब्दात उत्तरे देत ठाकरे यांनी आपण याही राजकारणात कोठे कमी नसल्याचे दाखवून देत संपूर्ण अधिवेशनावर आपली पकड दाखवून दिली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री असल्याने मंत्रिमंडळावर त्यांचा वरचष्मा असेल असा सर्वसाधारण मतप्रवाह राजकीय क्षेत्रात आतापर्यंत दिसून आला. उद्धव ठाकरे यांनी अतिशय परिश्रमपूर्वक या ६ दिवसांच्या अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणून सर्वत्र आपलाच ठसा असेल आणि हे सरकार ठाकरे सरकार म्हणून ओळखले जाईल याची चुणूक दाखवून दिली. हे त्यांच्या प्रतिमेच्या दृष्टीने खूप महत्वाचे ठरणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/