महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या प्रकरणात तात्काळ कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे पोलिसांच्या बैठकीत आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढवा बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मागील शासनाच्या कालावधीत निर्भया फंड मधील निधी खर्च झाला नाही. ही बाब गंभीर आहे. या निधीचा कशा प्रकारे त्वरित विनियोग करता येईल, याची कार्यपद्धती तयार करा, अशी सुचनाही त्यांनी यावेळी दिली. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येतील. आपल्या सरकारला खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचा आहे, असा विश्वास ठाकरे यांनी पोलीस दलाला दिला.

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावे. त्याला तात्काळ मान्यता देण्यात येईल. पोलिसांच्या घराचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, कर्तव्यकालावधीचे प्रश्न, कर्तव्य सहजतेने पार पाडता येथील यासाठीच्या सुधारणांसाठी प्रयत्नशील राहू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून त्याकडे जगाचे लक्ष असते. कोणत्याही दुर्घटना घडण्यापूर्वीच शहराच्या सुरक्षिततेसाठी सतत सतर्क रहावे, अशी सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिली.

Visit : Policenama.com