Coronavirus : CM उध्दव ठाकरेंनी ‘या’ अभिनेत्याला दिला शब्द, म्हणाले…

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे,मुंबई अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये करोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे देशात 21 दिवस लॉकडाउन करण्यात आला आहे. या काळात बाहेरील राज्यातील अनेक नागरिक मुंबईत अडकले असून त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. यात आंध्र प्रदेशमधील काही कुटुंबांचा समावेश असून दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत मागितली असून मुख्यमंत्र्यांनीही मदत करु, असे आश्वासन दिले आहे.

आंध्र प्रदेशमधील काही कुटुंब मुंबईतील गोमाहल्ली (पश्चिम) येथे अडकले आहेत. सध्या या कुटुंबांना अनेक अडचणी येत असून त्यांची मदत करावी यासाठी अभिनेता पवन कल्याणने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी या कुटुंबाची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ‘माननीय, उद्धवजी ठाकरे महाराष्ट्रात लॉकडाउन केल्यानंतर मुंबईतील गोमाहल्ली (पश्चिम) येथे आंध्र प्रदेशमधील कुर्नूल जिल्ह्यातील अलूरु अडोनी,मंत्रालयम,येम्मीनागनुर विधानसभा मतदार संघातील रोजंदारीवर काम करणार्‍या 500 पेक्षा जास्त कुटुंब अडकले आहेत.

सध्या त्यांना मुलभूत गरजाही मिळत नाहीयेत. त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की कृपया या नागरिकांची मदत करा’, असे ट्विट करत पवन कल्याणने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत मागितली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘पवन जी, तुम्ही काळजी करू नका. या संकटाच्या काळात अडचणीत असलेल्या सर्वांची मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्याशी संपर्क करून त्यांना त्वरित मदत पोचवली जाईल’, असे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे.