लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर CM ठाकरेंनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला आहे. देशातली विविध राज्यातील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियतेवर आयएएनएस आणि सी व्होटर्सने संयुक्तरित्या सर्व्हे केला आहे. या यादीमध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील या यादीत समावेश आहे. या यादीमध्ये उद्धव ठाकरे 5 व्या स्थानावर असल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले होते.

देशातील विविध राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी सर्व्हे करण्यात आला. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार उद्धव ठाकरे यांचा समावेश सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता 76.52 टक्के आहे. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर, हे माझे एकट्याचे यश नाही. सहा महिन्याच्या काळात शिवरायांचे हे राज्य पुढे नेण्यासाठी माला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हणाले की, मुख्यमंत्री हे निमित्त आहे. महाराष्ट्राची सेवा घडत आहे हे महत्त्वाचे. लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल हेच माझे ध्येय आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्राच्या जनतेने संकट काळात विश्वास दाखवला, माझे मंत्रिमंडळातील सहकारी, सर्व अधिकारी या सर्वांचे उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. तसेच शिवसैनिकांचे प्रेम आणि शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेबांचा आशिर्वाद या शिवाय ही झेप शक्य नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.