खडसेंच्या राजीनाम्यावर CM ठाकरेंची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून ते शुक्रवारी (दि.23) राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अधिकृतरित्या घोषणा केली आहे.

अतिवृष्टीगस्त भागांचा दौरा करत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या वृत्तावर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. चांगली गोष्ट आहे. खडसे महाविकास आघाडीच्या कुटुंबात येत असतील तर आनंद आहे, असं मोजक्या शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजप-शिवसेनेची युती तुटली होती. हा निर्णय घेणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये एकनाथ खडसेंच नाव सर्वात पुढे होतं. यानंतर शिवसेना आणि खडसे यांचे संबंध बिघडले. त्यामुळेच खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिवसेना काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले होते. खडसेंना राष्ट्रवादीकडून कृषीमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे.

काय म्हणाल जयंत पाटील ?

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रसमध्ये प्रवेशाबाबत जयंत पाटील म्हणाले, गेली तीन साडे तीन दशके भाजपमध्ये असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचे मला कळवलं आहे. ते शुक्रवारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच खडसे यांना मानणारे, त्यांचे पाठिराखे असलेले नेते आणि कार्यकर्ते देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

कधी होणार राष्ट्रवादीत प्रवेश ?

मुंबईत 23 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. एकनाथ खडसेंनी दवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावर उघडपणे नाराजी जाहीर केली होती. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत होती.

एकनाथ खडसेंची राजकीय कारकीर्द

एकनाथ खडसे हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात. मात्र, मुंडे यांच्या निधनानंतर कालांतराने खडसे यांना भाजपमध्ये डावलण्यात आलं होतं. एकनाथ खडसे यांनी राज्याच्या विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवलं होत. तसेच फडणवीस सरकारमध्ये ते महसूल मंत्री होते.