मुख्यमंत्री ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर पिस्तुलधारी तरूणाला अटक

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान परिसरात एका बंदूक धारी तरुणाला अटक करण्यात आली आहे. इर्शाद खान असं या तरुणाचं असून तो दरोड्याच्या उद्देशाने बांद्र्याच्या कलानगरमध्ये येथे आल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्याच्या परिसरात तो असता गस्तीवर असलेल्या पोलिसांनी इर्शादला ताब्यात घेतले.

दरम्यान, पोलिसांना याबाबत आधीच माहिती मिळाली होती कि, कलानगच्या परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले काही जण येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सतर्कता दाखवत ही कामगिरी केली. युनिट 9 च्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत परिसरास घेरले असता मातोश्रीजवळ 100 मिटर परिसरात इर्शाद खान संशयास्पद फिरताना आढळून आला, आणि त्याच्याजवळ पिस्तुल आढळल्यानं एकच खळबळ उडाली.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा या शासकिय निवासस्थानी न राहता मातोश्रीवर राहत आहेत. ‘मातोश्री’ ठाकरे कुटुंबीयांचं निवासस्थान असून ते शक्तीस्थान असल्याने उद्धव ठाकरेंनी ते सोडणार नसल्याचे सांगितलं. इथे नेहमीच कडक सुरक्षा व्यवस्था असते. त्यात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. त्यामुळे अशा हाय सेक्युरीटी झोनमध्ये हा दरोडेखोर कुठून आला ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

माहितीनुसार, इर्शादची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे नोंदवले गेले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर आता मातोश्रीच्या परिसरात सुरक्षा व्यवस्थेला आणखी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.