फडणवीस सरकारनं शेतकर्‍यांसाठी घेतलेला ‘तो’ निर्णय ठाकरे सरकारकडून रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय गुंडाळला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणलेली ‘बळीराजा चेतना योजना’ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना 24 जुलै 2015 रोजी जाहीर करण्यात आली होती. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात ही योजना अपयशी ठरल्याने ही योजना बंद करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने यासंदर्भातले आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारने या योजनेचा आढावा घेतला. उस्मानाबाद आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांमध्ये कोणतीही घट झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार 2001 ते 2019 या कालावधीत महाराष्ट्रात 32 हजार 605 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जेव्हा भाजपा-शिवसेना महायुतीचं सरकार होतं त्या कालावधीत 2015 ते 2018 या कालावधीत 14 हजार 989 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली.

काय होती योजना ?

– बळीराजा चेतना योजना 2016 मध्ये अमलात आणली गेली

– या योजनेत व्यथित शेतकऱ्यांना शोधणे, शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी सामूहिक विवाह आयोजित करणे अशी योजना होती.

– उत्तम आरोग्य सेवा पुरवणे, कर्जाचे पुनर्गठन करुन देणे याचीही तरतूद होती.

– अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य, महसूल, अर्थ खाते, जलसंपदा, महिला आणि बाल कल्याण विभागांच्या योजनांचे विलीनीकरण करण्यात यावे असाही प्रस्ताव फडणवीस सरकारने मांडला होता.

– सुरुवातीला ही योजना मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि विदर्भातील यवतमाळ या ठिकाणी अनुक्रमे 48.9 कोटी आणि 45.7 कोटींची तरतूद करण्यात आली होती.

मात्र आता ही योजना ठाकरे सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयाला भाजप कशा पद्धतीने प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like